मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मुंबईसह, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ सुरु करण्यात येणार आहे. भारतीय सागरी परिषदेच्या पुढाकाराने (इंडियन मेरिटाइम समिट) मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध कंपन्यांमध्ये याबाबत सामंजस्य करार करण्यात आले.
या करारानुसार येत्या काही महिन्यांतच मुंबईकरांना ‘वॉटर टॅक्सी’ सफर करता येणार आहे. या ‘वॉटर टॅक्सी’ तून नागरिकांना वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस ला काही वेळातच पोहचता येणार आहे.
‘वॉटर टॅक्सी’ मधून मुंबई ते बेलापुर हे अंतर तासाभरात पार करता येणार आहे. सुरवातीच्या काळात ‘वॉटर टॅक्सी’ ची क्षमता ही १० ते ५० प्रवासी इतकी असणार आहे. त्यानंतर ती टप्प्याने वाढवली जाणार आहे. ‘वॉटर टॅक्सी’ ची सुविधा देण्याची मागणी कॉर्पोरेट क्षेत्रातून मोठ्याप्रमाणात होत होती. ‘वॉटर टॅक्सी’ ची सुविधा ही रोजच्या दळणवळणासाठी असल्याने त्यानुसार त्याचे दरपत्रक लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. ही सेवा खासगी चालकांमार्फत चालवली जाणार आहे. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॅटामरान आणि लाँचचा वापर करण्यात येणार आहे.
नेरुळ आणि बेलापूर येथे जेट्टी बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. आणि आगामी दोन महिन्यात या मार्गावर ही सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. बंदर आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणुक वाढवण्यासाठी बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने २ ते ४ मार्च दरम्यान ‘भारतीय सागरी परिषदे’ चे आयोजन केले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने दोन दिवसात एकूण ७ हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. आणि एकूण २० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली आहे.






