नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा…मोदीचा पाहुणचार होणार ऑर्थर रोड जेलमध्ये, बराक क्रमांक १२ सज्ज…

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – १४ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सुद्धा नीरव मोदी आरोपी आहे. बिटनमधील एका न्यायालयाने नीरव मोदीने भारतातील न्यायालयासमोर जावून आपला खटला लढवावा, असा निर्णय दिला आहे. त्याच्याविरुद्ध भारतात निष्पक्षपणे चौकशी होवू शकते, असे सुद्धा बिटनच्या न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान सांगितले आहे. यामुळे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील सर्वात सुरक्षित अशा आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीला ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कारागृहप्रशासन सुद्धा सतर्क झाले आहे. त्याच्यासाठी १२ क्रमांकाच्या विशेष कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोठडीला कडक सुरक्षा व्यवस्था असणार असल्याची माहिती कारागृहाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. नीरव मोदीला कारागृहात ठेवण्याची सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. जेव्हा त्याचे प्रत्यार्पण होईल तेव्हा आर्थर रोड कारागृहातील त्याची कोठडी पूर्णपणे तयार असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभागाने केंद्र सरकारला एका पत्राद्वारे ही माहिती दिली होती की, जर नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण झाले तर मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात त्याची रवानगी करण्यास काहीही हरकत नाही आहे. त्याला कारागृहात कमी संख्या असलेल्या कैद्यांच्या कोठडीत ठेवण्यात येईल. आणि त्याला कॉटनची एक चादर, उशी, बेडशीट आणि ब्लॅकेट पुरवण्यात येईल. कारागृहातील ३ चौ.मी. ची जागा त्याला वापरता येणार आहे. याशिवाय या कोठडीत पुरेसा प्रकाश असणार आहे. तसेचं त्याचे सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ब्रिटनच्या प्रत्यार्पण कायदा २००३ नुसार न्यायाधीश त्यांचे निष्कर्ष गृहमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे पाठवतील. आणि भारताच्या गृहमंत्र्यांना भारत-ब्रिटन प्रत्यार्पण करारानुसार प्रत्यार्पणाचा आदेश जारी करण्याचा आधिकार आहे. हा निर्णय घेण्यासाठी गृहमंत्र्यांकडे २ महिन्यांची मुदत असते. आणि या २ महिन्यात ते केव्हा ही नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा आदेश काढू शकतात. न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध गृहमंत्री आदेश काढत नाहीत, अशी एक पद्धत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here