मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न फोल ठरताना दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णाचा आकडा ८ हजारांच्या वर गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या मास्कचा वापर योग्य ठिकाणी करताना नागरिक दिसून येत नाही आहेत. राज्यात मास्क घालणे बंधनकारक असले तरी काहीजण नाकाच्या खाली किंवा हनुवटीवर मास्क घालताना आढळून येत आहेत.
मुंबईमध्ये तर लोकलच्या प्रवासादरम्यान काहीजण या मास्कचा वापर डोळ्यावर ठेवून झोपण्यासाठी करताना दिसून येत आहेत. डोळ्यावर मास्क लावून लोकलमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करुन सांगितले आहे की, मित्रांनो असे बेजबाबदारपणे वागू नका, मास्कचा वापर योग्य ठिकाणी करा आणि कोरोना टाळा. सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तरी सुद्धा राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. असा सूचक इशारा यावेळी वडेट्टीवार यांनी दिला आहे.
मुंबईतील लोकलची गर्दी कशी कमी होईल यावर विचार सुरु असल्याचे सुद्धा वडेट्टीवार यांनी सांगितले आहै. तसेच लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचाही विचार केला जात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.






