नाशिक (विशेष प्रतिनिधी) – इगतपुरी जवळील बलायदुरी गावातील हॉटेल रेन फॉरेस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसून आले नाही. तसेच विनामास्कदेखील अनेकजण आढळून आल्याने ३० हजारांचा दंड या हॉटेलला करण्यात आला आहे…
अधिक माहिती अशी की, हॉटेल रेन फॉरेस्ट या हॉटेलमध्ये रात्री उशिरा लग्नसोहळा सुरु आहे. तसेच याठिकाणी कुठल्याही प्रकारे सामाजिक अंतर पाळले जात नाहीये आणि मास्कदेखील येथील नागरिकांनी परिधान केलेली नसल्याची गुप्त माहिती पोलिस उप अधीक्षक अर्जुन भोसले यांना प्राप्त झाली होती.
यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. विवाह समारंभात विना मास्क ३० जण आढळून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हॉटेल व्यवस्थापक व मालक यांच्यावर ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. इगतपुरी पोलीस ठाणे व घोटी पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही संयुक्तपणे कारवाई केली. यापूर्वीही 26 जून रोजी महाराष्ट्रात सर्व हॉटेल बंद असताना हे हॉटेल सर्रास चालू होते. तेंव्हाही इगतपुरी पोलिसांनी या हॉटेलवर कारवाही केली होती.






