एनसीबीचे दक्षिण मुंबईत छापे; तिघांना अटक

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने शनिवारी रात्री दक्षिण मुंबईतील डोंगरी, कुलाबा आणि नागपाडा परिसरात छापे टाकून तिघांना अटक केली. ऐयाज अहमद सुपारीवाला ऊर्फ सायको, राजन सुब्रमण्यम आणि अमजद अस्लम शेख अशी त्या तिघांची नावे आहेत. एनसीबीने कारवाई करून 162 ग्रॅम एमडी, रोख रक्कम आणि 25 मोबाईल जप्त केले आहेत.

दक्षिण मुंबईत काहीजण ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती एनसीबी मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने शनिवारी कुलाबा, नागपाडा आणि डोंगरी परिसरात छापे मारले. ऐयाजला नागपाडा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून 25 मोबाईल जप्त केले. तो अनेक पेडलरच्या संपर्कात होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. तर राजन आणि अहमद हे दोघे एमडीची विक्री करतात.

एनसीबीने त्या तिघांकडून 162 ग्रॅम एमडी आणि काही रक्कम जप्त केली आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रविवारी सायंकाळी त्या तिघांना अटक केली. त्या तिघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. एनसीबीने यापूर्वी डोंगरीमध्ये कारवाई करून ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करून चिंकू पठाण आणि आरिफ भुजवालाच्या मुसक्या आवळल्या होत्या. ते तिघे आरिफ किंवा चिंकूच्या संपर्कात होते का याचा तपास एनसीबी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here