औरंगाबाद (प्रतिनिधी) – सध्या देशात काय चालले आहे हे मलाच काय कुणालाही कळत नाहीय. देशाची राजधानी दिल्ली मुडद्यांचे शहर बनल्यासारखे वाटते. कुणाचाच आवाज दिल्लीत ऐकू येत नाही. संसद मूक, बधीर झाली आहे. विरोधक मुक्त हिंदुस्थानच्या ध्येयाने सत्ताधारी पिसाटले आहेत. अशा सगळय़ा वातावरणात देशाला उद्धव ठाकरे यांच्या रूपाने एक प्रकाशाचा किरण गवसला आहे. भाजपच्या दमनशाहीला उत्तर देण्यासाठी यूपीएचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसला नुसता पुढाकार घेऊन चालणार नाही तर त्याग करावा लागेल. काँग्रेसच्या त्यागावरच देशाचे पुढील राजकीय भविष्य अवलंबून आहे अशी स्पष्टोक्ती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
नगरसेवक चेतन कांबळे यांच्या वतीने आयोजित जयभीम फेस्टिव्हलचा आज प्रारंभ झाला. या फेस्टिव्हलमध्ये आज प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. देशात सध्या घटनेची पायमल्ली करणारे वातावरण आहे. विरोधी विचारच नको अशी भूमिका घेऊन सत्ताधारी सुडाचे राजकारण करत आहेत या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सध्याच्या राजकारणाचे पदरच उलगडून सांगितले.
पंडित नेहरूंना मोदी पाण्यात पाहतात. देशात जे काही घडले ते फक्त या सात वर्षातच घडले असा प्रचार केला जातो. नेहरूंच्या मंत्रिमंडळात पाच बिगर काँग्रेसी मंत्री होते त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश होता. विरोधकांना सोबत घेऊन जाण्यासाठी एक दृष्टी लागते. विरोधकांना संपवण्यासाठी इंदिरा गांधी यांनीही कधी एवढी पातळी गाठली नाही असे ते म्हणाले. सध्याच्या या सुडाचे राजकारणाची धग देशाला कुठे जाईल हे माहिती नाही पण याचे गंभीर परिणाम मात्र भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला. सरकारमधील तीनही राजकीय पक्षात कोणतीही मतभिन्नता नाही. पण सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अतिशय सरळ, प्रामाणिक नेते आहेत. पण राहुल गांधी यांचे नेतृत्व खच्ची करण्याचे काम सध्या होतेय. त्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली गेलीय. काँग्रेसची शकले पाडण्यात येत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या ‘विरोधक मुक्त भारत’ या भूमिकेचा राहुल गांधी बळी ठरले आहेत. राज्यकर्ता हा दिलदार असावा. पण इथे मनच नाहीयत, त्यामुळे अपेक्षा कुणाकडून करणार असे संजय राऊत म्हणाले.






