नवी दिल्ली – भारतात आजपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले असून कोरोनाची लस घेतली आहे. मोदींनी लस घेतानाच ट्विट करत ही माहिती दिली आहे.
या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. “एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी यावेळी लसीकरणासाठी पात्र देशवासियांना आवाहन केलं असून ‘भारताला कोविडमुक्त बनवूयात’ असं म्हटलं आहे. मोदींना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली.
नोंदणी करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक
सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणे आवश्यक आहे. ‘कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म’ हा आज १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना स्वत: नोंदणी करता येणार आहे.






