नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – उन्हाळ्याची चाहुल आता लागू लागली आहे. त्यामुळे ऊनाचे चटके तर बसतच आहेत. मात्र जंगल भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य झालेले आहे. तसेच गाव शिवारातदेखील आठवड्यातून केवळ तीन दिवसच वीज असते. परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आपल्या उन्हाळ व रांगड्या कांद्यला पाणी देण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहे. मात्र परिसरात बिबट्या फिरताना आढळल्याने, या शेतकऱ्यांची पाचावर धारण झाली आहे.
देवळा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरील भऊर, विडेवाडी, झिरेपिंपळ शिवारात या बिबट्याचा वावर वाढला असून, नरमादीसह त्यांचे बछडे मानवी वस्ती व शेतात राजरोस फिरताना आढळून आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना रोजच बिबट्याचे दर्शन होत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतात पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस जावे लागते. अद्याप मनुष्यहानी झाली नसली तरी अनेक शेळ्या, मेंढ्या, वासरं या बिबट्याने फस्त केल्या आहेत. बिबट्याच्या राजरोस वावराने शेतकरी धास्तावले असून, वनविभागाने याबाबत तात्काळ पावले उचलत कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकरी सुभाष पवार, पोपट पवार, योगेश पवार, अमर जाधव, दीपक पवार, प्रविण जाधव व कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे.






