नवी दिल्ली – संपूर्ण जगभर कोरोना पसरवणाऱ्या चीनची खुमखुमी कायम आहे. पूर्व लडाखच्या क्षेत्रात भारतीय लष्करापुढे गुडघे टेकणाऱ्या चीनने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिटय़ूट या कोरोना लस उत्पादक कंपन्यांना टार्गेट केले आहे. या दोन्ही कंपन्यांवर चिनी हॅकर्सनी नुकताच सायबर हल्ला केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारताने जगभर कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आघाडी मिळविल्यामुळे चीनचा जळफळाट वाढला आहे.
‘रायटर्स’ वृत्तसंस्थेने सायबर गुप्तचर संस्था असलेल्या ‘सायफर्मा’च्या हवाल्याने चीनच्या नवीन कुरापतीचा बुरखा फाडला आहे. भारत व चीनने अनेक देशांना कोरोना लसीची विक्री सुरू केली आहे. जगभर विक्री झालेल्या लसीच्या एकूण डोसपैकी 60 टक्के डोस भारतात उत्पादन झालेले आहेत. कोरोना लस पुरवठयातील भारताच्या या आघाडीमुळे चीनची पोटदुखी वाढली आहे.
यातूनच चीनी सरकारचे पाठबळ असलेल्या हॅकर्सच्या ‘एपीटी-10’ ग्रुपने भारत बायोटेक व सिरम इन्स्टिटयूटच्या आयटी इन्प्रास्ट्रक्चरमधील त्रुटी हेरून सायबर हल्ला केला आहे. जागतिक पातळीवर भारतीय लस उत्पादक कंपन्यांना खाली खेचणे व या कंपन्यांच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीला निशाणा बनवणे हा हॅकर्सचा सायबर हल्ल्यामागील मुख्य हेतू असल्याचे सायफर्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुमार रितेश यांनी म्हटले आहे. रितेश यांनी याआधी ब्रिटनच्या ‘एम16’ या गुप्तचर संस्थेत बडया पदांवर काम केले आहे.
‘एपीटी-10’ ग्रुप स्टोन पांडा या नावानेही ओळखला जातो. हा ग्रुप चीनच्या संरक्षण मंत्रालयासोबत काम करतो, असे अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या एका अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, भारत बायोटेक व सिरमवरील सायबर हल्ल्याच्या वृत्तावर दोन्ही कंपन्यांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनी सरकारनेही याबाबत काहीच भाष्य केलेले नाही. गेल्या वर्षी रशिया आणि उत्तर कोरियाने भारतासह इतर काही देशांतील कोरोना लस उत्पादक कंपन्या हॅकर्सच्या रडारवर असल्याचा इशारा दिला होता.






