मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती आग्रही असतात त्याची प्रचीती वेळोवेळी येत असते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानमंडळात प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचेच आमदार वैभव नाईक यांना चांगल्या दर्जाचा मास्क दिला आणि हा वापरा असा प्रेमळ सल्ला दिला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मुख्य प्रतोद सुनील प्रभू व अन्य काही आमदार व अधिकारी उपस्थित होते. विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतमध्ये शिरले तेव्हा शिवसेनेचे कुडाळ-मालवणमधील आमदार वैभव नाईक सामोरे गेले.
वैभव नाईक यांच्या तोंडावरील मास्क पाहिला आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्वतःच्या खिशात हात घातला आणि नवाकोरा मास्क वैभव नाईक यांच्या पुढय़ात धरला आधी तो मास्क बदला, आणि हा मास्क वापरा, असा प्रेमळ सल्ला दिला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीची धावपळ आणि घाईगडबडीतही कोरोनाचा संसर्ग रोखण्याठी किती जागरूक राहावे लागते त्याची प्रचीती मुख्यमंत्र्यांनी दिली.






