स्वस्त,दर्जेदार “खते, बियाणे, औषधांचा” पुरेसा आणि तातडीने पुरवठा करा – सादिक खाटीक यांची मागणी

आटपाडी (प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्व संबधीत अधिकारी , पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये खते,बियाणे, औषधांचा माफक दरात पुरवठा करण्यासंबधी तातडीने निर्णय करा ,अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या ईमेल निवेदनाच्या प्रति वरील मान्यवरांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील , कृषीमंत्री दादाजी भुसे ,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम ,सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दतात्रय भरणे यांना पाठविण्यात आल्या आहेत .
सांगली ,सातारा ,सोलापूर या जिल्ह्याच्या सरहद्दीवरील दुष्काळी माणदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी, खानापूर,जत,कवठेमहंकाळ ( सांगली जिल्हा ), माण,खटाव ( सातारा जिल्हा ) आणि सांगोला, मंगळवेढा ( सोलापूर जिल्हा ) या आठ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची खते, बियाणे, औषधांबाबत मोठी फरफट चालु आहे .
रासायनीक खते,औषधांच्या दुकानातून घेतलेल्या बाजरी,मका या पिकांच्या बियाणांची अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही . काही पिशव्यातील बियाणे उगवले तर काही पिशव्यातील बियाणांची उगवण झाली नाही . याबाबत शेतकऱ्यांनी दुकानदारांकडे विचारणा केल्यावर , तुम्ही चुकीच्या पद्धतीने पेरले असेल, अमूक केले असेल , तमुक केले असेल . तुमच्याकडे खरेदीची पावतीच नाही अशी कारणे सांगत बोळवण केली जात आहे . माणदेशातील आठ तालुक्या बरोबर अन्य तालुक्यातील बोगस बियाणांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नापिकीचा तातडीने सर्व्हे करून सरकारने त्यांना भरपाई द्यावी . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी रासायनीक खत — औषधांच्या दुकानातून युरीया बाबत सध्या मोठी अडवणूक केली जात असल्याचे गावोगावच्या शेतकऱ्यांची तक्रार आहे. युरीया हवा असेल तर १८:४६ किंवा १०:२६ यापैकी खत घ्या किंवा बियाणांची पिशवी घ्या . किंवा औषधे खरेदी करा अशी अनावश्यक गळ घातली जात आहे . जेवढ्या प्रमाणात युरियाच्या पिशव्या हव्यात तेवढ्या प्रमाणात इतर खते, औषधे, बियाणांच्या पिशव्या संबधीतांच्या माथी मारल्या जात आहेत . आणि जे शेतकरी इतर खरेदी करण्यास तयार नाहीत त्यांना यूरिया संपल्याचे बिनदिक्कतपणे सांगीतले जात आहे. तुम्ही आमच्याकडे युरीया साठीच आलात, पहिल्यांदाच आलात ,अन्य वेळी तुम्ही दुसरीकडून खते ,बियाणे, औषधे खरेदी करता, मग आता तुम्हाला फक्त यूरियाच का द्यावा . अशा दुकानदारांच्या प्रश्नानी गरजवंत शेतकरी हतबल झाल्याचे जाणवते. बऱ्याच ठिकाणी बियाणे खरेदीच्या पावत्याच दिल्या जात नाहीत . एखाद्याने मागीतल्यास टाळाटाळ करून विना पावती त्याची पाठवणी केली जाते .
सध्या सर्वत्र आढळणाऱ्या या परिस्थितीने दुष्काळी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खते, औषधे,बियाणे यांच्या बाबतीत कोणा एका कंपनी अथवा उद्योगाची अथवा दुकानदारांच्या साखळीची मक्तेदारी निर्माण न होवू देता शेतकरी, कष्टकऱ्यांच्या बांधापर्यत वेळेवर आणि गरजेनुरूप बियाणे, खते, औषधे पुरविण्याचे नवे धोरण तातडीने अंमलात आणले पाहीजे. पुरेशी वीज आणि आवश्यक पाणी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे ,खते ,औषधे वेळेवर आणि माफक किंमतीत उपलब्ध करण्याची राज्य सरकारने बांधीलकी स्विकारली पाहीजे . तातडीने याबाबत आवश्यक ती उपाय योजना करून राज्यातल्या गरजवंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीनुसार प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी आणि शेती खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे,खते ,औषधे विक्रीचे तात्पुरते केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीत चालु करावे . माफक दरातल्या खरेदीच्या पावत्या देतानाच बियाणे , खते औषधांमधून फसगत झाल्यास नुकसान भरपाईची हमीही त्याबरोबरच देण्यासाठीचा निर्णय आपल्या सरकारने करावा अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here