जयंत पाटील यांच्याकडे सादिक खाटीक यांची मागणी
आटपाडी (प्रतिनिधी) – पाणी परवाना क्षेत्र वाढवून देण्यासाठी २१ हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या आटपाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी आर.एस.पवार यांची सत्वर सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी जलसंपदा मंत्री ना . जयंतराव पाटील यांना पाठविलेल्या ईमेल पत्राद्वारे केली आहे.
आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी गावचे दोन तरुण मधुकर खोत,मोहन मुढे यांच्या सहकार्याने, आटपाडीच्या पत्रकारांसमोर सदर लाच मागणीचे प्रकरण चव्हाट्यावर आणण्यात मोलाची व धाडसी भूमिका बजावणाऱ्या आटपाडीचे युवक नेते अनिलशेठ सर्जेराव पाटील यांचे तसेच खोत,मुढे यांचे अभिनंदन करून सादिक खाटीक यांनी सर्वांना धन्यवाद दिले .
मुढेवाडी येथील मधुकर खोत व मोहन मुढे यांनी पाटबंधारे विभागाकडुन कामथ तलावातुन पाणी उपशाचे परवाने घेतले आहेत . सदर उपशाचा यंत्र परवाना वाढविण्यासाठी संबंधितानी पाणी परवाना क्षेत्र वाढीचा प्रस्ताव सादर केला होता . तो प्रस्ताव टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग तासगाव येथून मे महिन्यात परत आला. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी २१ हजार रूपये द्यावेत. एक कागदही न घेता तो परवाना मंजुर करून देवू. शिवाय येणाऱ्या पाणीपट्टीतही सुट देण्यासाठी सदरची रक्कम द्यावी, अशी मागणी आटपाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी आर.एस पवार यांनी भारत मोहन मुढे यांच्याकडे केल्याचे त्यांचे म्हणणे आहे . लोकप्रतिनिधींकडे का जाता, आमच्याकडे या. पैसे द्या आणि परवाना न्या, असा सल्लाही त्यांनी संबंधिताला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले . सदर तरूणाने ही बाब युवा नेते अनिलशेठ पाटील यांच्या निदर्शनास आणुन दिली. पवार यांनी ही मागणी केल्याचे मान्य करून कागदपत्रे अपुरी असल्याने उपसा यंत्र परवाना वाढविण्यासाठी ही रक्कम मागितल्याचे पत्रकारांसमोर कबूल केल्याचे वृतपत्रातील आणि सोशल मिडीयातील बातम्यां मधून स्पष्ट करण्यात आले .टेंभुचे कार्यकारी अभियंता रेडीयार यांच्याशी संपर्क साधुन आटपाडीतील अधिकाऱ्याच्या या उद्योगाची माहिती अनिलशेठ पाटील यांनी त्यांना दिल्याचे आणि २१ हजाराची लाच मागीतल्याचे कबुल करणाऱ्या अधिकारी पवार यांच्यासमोर आटपाडीचे सुरज मुल्ला ( तरुण भारत),अविनाश बाड ( लोकमत ), सतिश भिंगे ( पुण्यनगरी , केसरी ) हे पत्रकार उपस्थित असल्याचे स्पष्ट केले आहे .अनिल पाटील यांनी अधिकारी पवार यांचा भांडाफोड करताच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचा दिखावा करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी पवार यांच्या या लाच प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास तातडीने कठोर कारवाई करावीच तथापि पाटबंधारे विभागात बोकाळत चाललेल्या भ्रष्टाचारालाही तातडीने चाप लावला जावा अशी अपेक्षा ही सादिक खाटीक यांनी केली आहे.







