देशातील शुद्ध पाणीपुरवठ्याच्या बाबतीत देशात मुंबई नंबर वन!

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईकरांना सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी पालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या देशात गौरव झाला आहे. इंडियन वॉटर वर्कस् असोसिएशनकडून शुक्रवारी हैदराबाद येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.

पालिकेचे जल अभियंता अजय राठोर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील 20 प्रमुख शहरांच्या पाणीपुरवठय़ात मुंबई महानगरपालिकेचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे स्पष्ट झाल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना अल्प दरात नागरी सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये एक हजार लिटर पाणी शुद्ध करण्यास पालिका सुमारे 16 ते 24 रुपयांचा खर्च करते आणि हेच पाणी मुंबईकरांना 3 ते 4 रुपयांपर्यंत एक हजार लिटर असे दिले जाते. पाणी शुद्धीकरणासाठी पालिकेकडून भांडुप, पांजरपोळ या ठिकाणी प्रक्रिया केली जाते.

यासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतूनही वेळोवेळी नमुने घेऊन तपासणीही केली जाते. मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. इतक्या मोठय़ा प्रमाणावर पाणीपुरवठा करूनही पालिकेचे पाणी देशातील 20 शहरांच्या तुलनेत सर्वोत्तम ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here