नवी दिल्ली – लग्नानंतर आपल्या सासरी जाताना माहेर सोडण्याचं दुःख प्रत्येक मुलीला असतं. त्यामुळे पाठवणीवेळी जवळपास सगळ्याच नवऱ्या रडतात. मात्र, याच गोष्टीनं आता एका नवरीचा जीव घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ही घटना आहे ओडिशाच्या सोनूपर जिल्ह्यातील. माहेर सोडताना अतिप्रमाणात रडल्यानं हृदयविकाराच्या झटक्यानं नवरीचा मृत्यू झाला आहे. गुप्तेश्वरी साहो अका रोझी असं तिचं नाव आहे. जुलुंदा गावातील रोझी हिचा तेतेलगावातील बिसीकेसन नावाच्या एका तरुणासोबत शुक्रवारी विवाह झाला. मात्र, जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा रोझी रडू लागली आणि रडण्यादरम्यान ती जमिनीवर कोसळली. नातेवाईकांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून आणि हाताची मसाज करून तिला उठवण्याचा प्रयत्न केला.
नातेवाईकांनी अनेक प्रयत्न केल्यानंतरही रोझी मात्र उठली नाही, तेव्हा तिला तात्काळ जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. इंडिया टूडेनं दिलेल्या वृत्तानुसार, गावातील एका व्यक्तीनं सांगितलं, की काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झाल्यानं ती प्रचंड तणावात होती. तिच्या नातेवाईकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिचा मृत्यू झाला.






