सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – येथील शासकीय रुग्णालय आपल्या गलथान कारभाराने सातत्याने चर्चेत असते. आज पुन्हा एकदा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या रुग्णालयाने नातेवाईकांना मयत झालेल्या महिलेचा मृतदेह देण्याऐवजी पुरुषाचा मृतदेह दिला.
सांगली सर्वसामान्य शासकीय रुग्णालयामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, इचलकरंजी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमा भागातील कर्नाटक या ठिकाणाहून अनेक रुग्ण उपचारासाठी इथे येतात. बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरहून एक महिला उपचारासाठी आली होती. ही महिला वयोवृद्ध असल्याने शासकीय रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पहाटे 5 वाजता नातेवाईक मृतदेह घेऊन आपल्या गावी निघाले. पण गावाकडे जात असताना वाटेत इचलकरंजीजवळ पोहोचल्यावर नातेवाईकांच्या लक्षात आलं की, आपल्याबरोबर जो मृतदेह आहे तो आपल्या नातेवाईकांचा नसून तू दुसऱ्याच कुणाचा तरी आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांनी रुग्णवाहिका परत मागे फिरवली. रुग्णालयात मृतदेह परत देण्यासाठी आले असता नातेवाईक आणि रुग्णवाहिका चालकासोबत गाडीच्या भाड्यावरून वादावादी झाल्यामुळे हा प्रकार समोर आला.
नातेवाईकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परत रुग्णालयाला जाऊन वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले. यावेळी चालक मालक रुग्णवाहिका संघटनेने या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला.






