देशी दारू दुकान मालकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न, कारण…

सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयासमोर एका देशी दारू दुकान मालकाने स्वतःवर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. मयूर भलानी असे या आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे.

मागील वर्षभरापासून मयूर भलानी हे त्यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना नुतनीकरण करण्यासाठी ते सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांच्या दुकानाचा परवाना नुतनीकरण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना कुठलीही आणि कसलीही दाद न दिल्याने शेवटी वैतागलेल्या देशी दारू दुकान मालक आणि चालक असलेल्या मयूर भलानी यांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात प्रवेश करून हातात डिझेलचा डबा घेऊन स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

मयूर भलानी यांचे माढा तालुक्यातील कुर्डुवाडीमध्ये एस.टी स्टँड शेजारी देशी दारूचे दुकान आहे. सदर दारूच्या दुकानाचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय सोलापूर येथे वर्षभरापूर्वी अर्ज केला होता. बंद असलेले देशी दारूचे दुकान उघडण्यासंदर्भात मालक मयूर भलानी यांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय येथे रितसर अर्ज केला होता. मात्र रितसर अर्ज देऊन एक वर्ष लोटले मात्र अद्यापही राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुठलीही व कसलीही दाद न दिल्याने अखेरीस देशी दारू दुकानाचे मालक मयूर भलानी यांनी वैतागून सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय येथे हातात डिझेलचा डबा घेऊन स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहून तात्काळ मयूर यांच्या हातातील काडीपेटी काढून घेत त्यांना घट्ट मिठी मारत शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शासकीय कार्यालसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतरही मला परवाना न मिळाल्यास मी पुन्हा वारंवार आत्मदहनाचा प्रयत्न करत राहणार असल्याचा इशाराही त्याने यावेळी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here