कोलकाता – पश्चिम बंगालमधील आगामी विधासनभा निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणखी झटका बसला आहे . प्राप्त माहितीनुसार दक्षिण २४ परगनामधील सतगछिया येथून तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा भाजपात प्रवेश करणार आहेत. सोनाली गुहा या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळच्या सहकारी होत्या.
तृणमूल काँग्रेसकडून यंदा सोनाली गुहा यांना उमेदवारी दिलेली नाही. तर, तृणमूलकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर सोनाली गुहा यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळलं होतं. त्यांनी हे देखील म्हटलं होतं की, देव ममता बॅनर्जींनी सदबुद्धी देवो. मी ममता बॅनर्जींनी सुरूवातीपासून साथ दिली आहे. माहिती नाही त्यांनी असा निर्णय का घेतला आहे.
दरम्यान, आज(शनिवार) तृणमूल काँग्रेसचे नेते व माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.






