चंदीगड (पंजाब) – आपल्या हवाई दलाच्या ताफ्यात राफेल हे लढाऊ विमान आल्यामुळे हवाई दलाची ताकद खूप वाढलीय, पण पंजाबात एक असे राफेल आहे जे हवेत उडण्याऐवजी चक्क जमिनीवरून धावतंय. आश्चर्य वाटलं ना… भठिंडा येथील रामा मंडीतल्या एका आर्किटेक्टने राफेल जेटच्या आकाराचे एक वाहन बनवलं आहे. लढाऊ विमानासारखे दिसणाऱ्या या वाहनाला त्याने ‘पंजाब राफेल’ असं नाव दिलंय.
आर्किटेक्ट रामपाल बेहनीवाल यांनी बनवलेलं हे अनोख वाहन ताशी 15 ते 20 किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते. तीन जण यात बसू शकतात. हे वाहन बनवण्यासाठी त्यांना एकूण तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे.
या वाहनाचा रंग निळा असून याच्या बोनेटवर ‘राम पाल एअरलाइन’ आणि त्यांचा मोबाईल नंबर लिहिला आहे. रस्त्यावरून धावणारं हे आगळंवेगळं राफेल लोकांच्या उत्सुकतेचा विषय बनले आहे. या वाहनाला छप्पर नाही आणि याच्या दोन्ही बाजूला ह्यु मिरर आणि विंडशील्ड लावले आहेत.
Punjab: Architect designs jet-shaped vehicle that runs at 15-20km/h speed in Bathinda's Rama Mandi. pic.twitter.com/NBLWCLA8RJ
— ANI (@ANI) March 4, 2021
आर्किटेक्ट रामपाल बेहनीवाल म्हणतात, ‘जे लोक प्रत्यक्ष विमानात बसू शकत नाहीत, ते या वाहनात बसून त्यांचे विमानात बसायचे स्वप्न पूर्ण करू शकतात.’ यापूर्वीदेखील बेहनीवाल यांनी भंगारातून रेल्वे इंजिन तयार केले होते.






