चंदीगड – हरयाणा विधानसभेत आज अविश्वास प्रस्ताव सादर होणार आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी युती ही सरकार कोसळण्याच्या चिंतेने अस्वस्थ आहे. तर आता जननायक जनता पार्टीच्या चार आमदारांनी विरोधी सूर लावल्यामुळे जजपा आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे टेन्शन वाढले आहे. अविश्वास प्रस्तावावर पार्टीच्या व्हिपचे पालन केले जाईल, असं टोहाना येथील जजपाचे आमदार देवेंद्र बबली यांनी मंगळवारी सांगितलं. पण या सरकारपासून वेगळे व्हा, हे आम्ही दुष्यंत चौटाला यांना सांगणार आहे. कारण आता जनतेत जाणं अवघड झालं आहे, असंही देवेंद्र बबली म्हणाले.
हरयाणा विधानसभेत टोहाना येथील जजपाचे आमदार देवेंद्र बबली यांनी कृषी कायद्यांना विरोध करत आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर बरवाला येथून जजपाचे आमदार जोगीराम सिहाग, नारनौदचे आमदार रामकुमार गौतम आणि गुहला येथील आमदार आणि जजपा विधिमंडळ पक्षाचे उपनेते इश्वर सिंह यांनीही तिखट सवाल करत आपल्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांच्या अडचणीत भर टाकली.
हरयाणा विधानसभेत बुधवारी सत्ताधारी भाजप, जजपा युतीला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जजपाने व्हिप जारी करत पक्षाच्या नाराज आमदारांचे हात बांधले आहेत. पार्टीने काढलेल्या व्हिपमुळे अविश्वास ठरावावेळी आपण सरकार सोबत राहू. पण पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सत्ताधारी युतीतून बाहेर पडावं, असं देवेंद्र बबली म्हणाले.






