सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – मैदानात डीजे लावून नाचणारे आणि वाळूची गाडी सोडून देणारे तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी झटका दिला आहे. निलंबित केलेले वेळापूर व मोहोळ तालुक्यातील आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे, सहायक फौजदार पितांबर मारुती शिंदे यांना निलंबित केले आहे. माळशिरसमधील वेळापुरातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व पोलीस नाईक विनोद साठे यांनी वाढदिवसानिमित्त डीजे लावून मैदानात नाच केला होता. जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून जाधव व नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याची दखल घेत दोघांना निलंबित केले आहे.
दुसरी घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे घडली आहे. आष्टे येथे वाळू उपसा करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल हस्तगत केला होता. सदर गुह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असताना यातील आरोपींशी चर्चा करून सोडून दिल्याची घटना, फोटो व व्हिडीओमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत सहायक फौजदार पितांबर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.






