15,16 मार्च रोजी बॅंकांचा देशव्यापी संप

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी जवळपास दहा लाख कर्मचारी असलेल्या सरकारी बँका आणि काही जुन्या खासगी बँकांनी येत्या 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारला आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सरकारच्या 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीच्या मोहिमेचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. वर्ष 2021-22मध्ये आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त दोन सरकारी बँका आणि एका विमा कंपनीचं खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या निर्णयाच्या विरोधात देशभरातील नऊ बँक कर्मचारी संघटनांची महासंघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं (UFBU) 15 आणि 16 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

15 आणि 16 मार्च रोजीच्या संपापूर्वी 13 मार्चला दुसरा शनिवार आणि 14 मार्च रोजी रविवार म्हणून बँका बंदच असणार आहेत. त्यामुळं चार दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात या चार दिवसात एटीएम सेवा सुरू राहील; मात्र चेक क्लिअरन्स, नवीन खाती उघडणे, डिमांड ड्राफ्ट जारी करणे आणि कर्ज प्रक्रिया या सेवांवर 17 मार्चपर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) संप काळात कामकाज सुरळीत सुरू राहावं यासाठी सर्व शाखा आणि कार्यालयांमध्ये पर्यायी व्यवस्था केली असल्याचं म्हटलं आहे. संपाचा परिणाम कामकाजावर होऊ शकतो असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे.

एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक या आधुनिक काळातील खासगी बँका या संपात सहभागी नसल्यानं त्याचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. बँकिंग सेवेतील केवळ एक तृतीयांश हिस्सा या बँकांचा आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here