बिहारमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण फाशीवर लोंबकळलेल्या अवस्थेत आढळले

सुपौल (बिहार) – काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या बुराडी प्रकरणानं अनेकांना धक्का बसला होता. आता बिहारच्या सुपौल भागातही असंच एक प्रकरण समोर आलंय. सुपौलमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी फाशी लावून जीवन संपवल्याचं समोर येतंय. यामध्ये पती-पत्नीसहीत त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडालीय.

सुपौलच्या राघोपूर स्टेशन हद्दीत येणाऱ्या गद्दी गावात ही घटना घडलीय. गावात राहणाऱ्या मिश्री लाल साह यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी सरपंचांकडे केली. त्यानंतर गावकऱ्यांनी रात्री ९.०० वाजल्याच्या दरम्यान मिश्री लाल यांच्या घराची खिडकी उघडली तेव्हा अनेकांच्या डोळे पांढरेफटक पडले.

आतून बंद केलेल्या घरात कुटुंबातील सर्वच सदस्य एका रांगेत फाशीला लोंबकळलेल्या अवस्थेत ग्रामस्थांच्या नजरेस पडले. ग्रामस्थांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. मृत कुटुंबाची गावातल्या कोणाशीही शत्रूत्व नव्हतं की भांडणतंटा नव्हता. मिश्री लाल यांच्याकडे आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाचं आणि रोजगाराचं काहीही साधन नव्हतं. ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबानं हे धक्कादायक पाऊल उचललं असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केलीय.

मिश्री लाल यांनी काही व्यवसायाचा प्रयत्न केला होता परंतु यात त्यांच्या पदरी अपयशच पडलं. त्यानंतर ते कोळसा खरेदी-विक्रीचं काम करत होते. कुटुंबात कुणीही जास्त शिकलेलं नव्हतं. केवळ मुलाचं शिक्षण सुरू होतं. मुलींचंही शिक्षण अर्ध्यावरच थांबलं होतं.

या कुटुंबानं पाच-सहा दिवसांपूर्वीच आपलं जीवन संपवल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळेच घराबाहेरही मृत कुजलेल्या शरीरांचा अत्यंत दुर्गंध पसरला होता. मृतांत मिश्री लाल, त्यांची पत्नी, दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. भागलपूरमधून फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here