पुण्यात अठरा वर्षांपुढे सर्वांना लस मिळणार?; केंद्राला पाठवणार प्रस्ताव

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक झाली असल्याने पुण्यातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, ‘करोनाची पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक झाली आहे. दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी करायचे असेल; तर लसीकरण हा प्रमुख उपाय आहे. डॉक्टर आणि अन्य तज्ज्ञांच्या मते लसीकरणामध्ये पुण्याला प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊन सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल.’

‘सध्या जिल्ह्यात दररोज २३ ते २४ हजार लोकांना लस देण्यात येत आहे. हे प्रमाण वाढविले; तर परिस्थिती आटोक्यात येईल. १६ जानेवारीला पुण्यात ३१ लसीकरण केंद्रे होती. दहा मार्चला केंद्रांची संख्या २०८ झाली आहेत. बहुतांश आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. लशींचा साठा उपलब्ध करून देणे आणि लसीकरण केंद्रांमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची सूचना पवार यांनी केली आहे; तसेच खासदार गिरीश बापट आणि श्रीरंग बारणे यांनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून मागणी मान्य झाल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here