सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद निवडीच्या वादातून सोलापुरात शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांमधला वाद विकोपाला गेला असून दोघांचं गाऱ्हाणं मातोश्रीपर्यंत न थांबता थेट कोर्टात गेलं आहे. या वादाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत स्थानिक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक चक्रावले आहे.आता सर्वांचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे.
शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी कांही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यावर मांडवलीचे आरोप केले होते. त्यानंतर जिल्हाप्रमुख बरडे यांनी १९८५ पासून सेनानिष्ठ असल्याचे सांगत आरोपकर्ते नगरसेवक शेजवाल यांच्यावर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर आपण दलित असल्यानेच आपल्याला संपविण्याचा प्रयत्न बरडेंकडून सुरु असल्याचा आरोप शेजवाल यांनी केला आहे.
दरम्यान, या परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोपाबाबत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वरिष्ठ नेतृत्वाला माहिती दिली आहे, मात्र मातोश्रीवरून अद्याप कोणतेच फर्मान न आल्याने सोलापुरातल्या शिवसेनेतील चिखलफेक शहर-जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे.






