मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्येच भाजपला धक्का देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगाव महापालिकेची सत्ता भाजपच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. ५७ सदस्य असलेल्या भाजपकडे सध्या महापौरपद आहे. मात्र येत्या दोन दिवसांत नव्या महापौरांची निवड होणार आहे. यावेळी भाजपचे १५ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी आज मुंबई गाठली आहे. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. हे नगरसेवक सेनेच्या गटात गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या ५ वर्षात जळगाव जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनीही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली. मात्र या सत्तेला आता सुरुंग लागला आहे.
भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. या दोन शक्ती एकत्र झाल्यास आगामी जिल्हापरिषद, महापालिका आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी हे मोठं आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.
जळगाव भाजपमध्ये गिरीश महाजन पर्व सुरू झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांच्या राजकीय खच्चीकरणाची एकही संधी सोडण्यात आली नाही. महापालिका निवडणुकीत खडसे समर्थक एकाही नागरसेवकाला भाजपने तिकीट दिलं नाही. आता त्याच एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला एक एक धक्का देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने महापालिका सत्ता आणली खरी, पण राज्यात भाजपने सत्ता गमावली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपात राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक सेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचं दिसत आहे.
अशातच सुरेशदादा जैन हे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. जर भाजप विरोधात एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन हे समीकरण जुळून आलं तर भाजपला आगामी जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणूक सोपी ठरणार नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे आता राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे






