कोरोनाकाळातही नागपूरकरांची बेफिकीरी; वाजत-गाजत निघाली वरात, एकाच्याही चेहऱ्यावर नव्हता मास्क

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असतांनाही, लोकांची बेफिकीरी कायम असल्याची घटना नागपूर येथे घडली आहे. कडक निर्बंध असतानाही नागपुरकरांनी वाजत-गाजत वरात काढल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नागपुरच्या महाल परिसरातही लग्नाची वरात काढण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. वऱ्हाडी नाचण्यात दंग होते. शंभरहून अधिक लोक या वरातीत सामील झाले होते. विशेष म्हणजे वरातीत एकाच्याही तोंडाला मास्क नव्हता.

एकीकडे मागील तीन दिवसांपासून नागपूरात 2 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज सापडत असून सुद्धा नागपूरात लोकांना कोरोनाची भीती राहिली नाही असं दिसून येत आहे.

लग्न समारंभात मोठ्या स्वरूपात बंदी असली तरी महाल या परिसरात एका लग्नाची वरात रविवारी निघाली. त्यामध्ये शेकडो वराती सहभागी झाले होते. सोशल डिस्टन्सिंगचा मोठा फज्जा उडाला. यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विदर्भात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नागपुरात राज्य सरकारने कडक निर्बंध लावले असतानाही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दिसत आहे.

13 मार्च रोजी नागपुरात 2261 नवीन रुग्ण आढळून आले आणि 07 जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here