मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ भीषण अपघात; कारचा चक्काचूर

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ दुर्वेस गावाच्या हद्दीत दोन कारच्या भीषण अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी (दि.१५) आठ ते साडेआठच्या सुमारास दुर्वेस गावाजवळ विठ्ठल कामत हॉटेलच्या परिसरात हा अपघात घडल्याची माहिती आहे.

मुंबईकडे भरधाव वेगाने येणारी एक कार डिव्हाइडर ओलांडून अचानक विरुद्ध दिशेला गेली. सुसाट दुसऱ्या दिशेला आलेल्या या कारने गुजरातकडे जाणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात समोरील कार चक्काचुर झाली. त्यात अडकून वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. शोभीत कुमार दास (वय- 41 रा. सुरत) असं मृत व्यक्तीचं नाव असून मयत इसमाशिवाय तिघेजण जखमी असून जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तिघांनाही मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, भीषण अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती. पण, महामार्ग पोलीसांनी दोन्ही अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here