औरंगाबादमध्ये हॉटेल, ढाबे, रिसॉर्टमध्ये भोजनास बंदी

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – राज्यातील करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी प्रमुख शहरांमध्ये मोठ्याप्रमाणवर करोनाबाधित आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्ट मधील डायनींग सुविधा १७ मार्च सायंकाळी ६ पासून ते ४ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज(सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

वेरुळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आहेत. तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे नव्याने घातलेल्या निर्बंधात म्हटले आहे. औरंगाबाद शहरात गुरुवारपासून अशंत: टाळेबंदी लागू करण्यात आली असून सायंकाळी ९ वाजेपासून सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश तीन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या आदेशात दुरुस्ती करुन पर्यटनस्थळे, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद करण्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दुकाने सुरू ठेवण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here