शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुकेश अंबानी प्रकरणात ठाकरे सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमवेत एक तास चर्चा केली. या चर्चेचा केंद्रबिंदू सचिन वाझे असल्याची माहिती मिळाली आहे.

वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या सचिन वाझे पोलिस दलातून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेकडून सचिन वाझेंना चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत. वाझे यांची नुकतीच विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने त्यांना चौकशीसाठी बोलवत अटकेची कारवाई केली.

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेली स्कॉर्पिओ जीप आणि त्यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘एनआयए’ विशेष न्यायालयाने रविवारी 25 मार्चपर्यंत ‘एनआयए’ कोठडी सुनावली आहे.

तब्बल 13 तासांच्या कसून चौकशीनंतर ‘एनआयए’ने शनिवारी मध्यरात्री वाझे यांना अटक केली होती. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली जीप उभी करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप ‘एनआयए’ने केला आहे. याच आरोपांखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here