आरोपींना भेटू न दिल्याच्या रागातून भुसावळ येथे पोलिसांना मारहाण

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक असलेल्या सुर्यवंशी बंधूना भेटण्यासाठी रात्री आलेल्या एकास पोलीसांनी मज्जाव केला.यामुळे त्या व्यक्तीने पोलीसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक केली आहे. या प्रकारामुळे वरणगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, वरणगाव पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याप्रकरणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी व त्यांचा भाऊ अनंता सुर्यवंशी यांना अटक केली आहे.सदरहू दोघांना न्यायालयाने दि.16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघेही वरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात असल्याने सुर्यवंशी बंधूना भेटण्यासाठी गिरीष तायडे हा इसम (सामाजिक कार्यकर्ता नव्हे) दारूच्या नशेत आला होता.

यामुळे पोलीसांनी त्याला मज्जाव केला असता त्याने पोलीसांशी हुज्जत घालुन शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून दमदाटी केली. या दरम्यान पोलीसांना संशय आल्याने त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ पाच इंचाचा बटनाचा धारदार चाकु आढळून आला. यामुळे पोलीसांनी त्याला अटक करून आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर न करता भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अतिरीक्त पोलीस बंदोबस्त-वरणगाव पोलीस ठाण्यात झालेल्या गदारोळामुळे अतिरीक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.यामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. तर सुर्यवंशी बंधूंची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here