जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम नागपूर येथे आज खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
अत्यंत कडक शिस्तीचे आणि कामातील गुणवत्तेला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून एक ओळख असलेले डॉ. सुधीर मेश्राम ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी पहाटे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. सुधीर मेश्राम यांनी अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मायक्रोबायोलॉजीत एम.एस्सी. नंतर पीएच.डी. केली. ते नागपुर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंट सुध्दा मिळविले होते. यानंतर त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या काळात विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देश पातळीवर वाखाणण्यात आला होता. इतकेच नव्हे तर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये कडक शिस्तीचे कुलगूरू म्हणून अशी एक ओळख त्यांनी निर्माण केली होती.






