धुळे (प्रतिनिधी) – शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी चौफुलीजवळ भरधाव बसेने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूण मुलगा जागीच ठार झाला. तर त्यांची आई जखमी झाली आहे.आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गेल्या महिन्यातही याच ठिकाणी एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची मागणी होत आहेत.
संतोष द्वारकाप्रसाद चौरसिया (वय 31 रा.हमाल मापाडी, धुळे) हा तरुण त्याची आई वर्षा चौरसिया (वय 58) यांना सोबत घेवून दुचाकीने (क्र.एमएच 18/एएम 0964) आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाईजीनगरात नातेवाईकांकडे जात होता.या वेळी बीडकडून धुळ्यात येणार्या एसटी बसने चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात संतोषच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर त्यावेळी सोबत असलेल्या त्याच्या आईला किरकोळ दुखापत झाली. पंरतू त्यांनी संतोषला रक्ताच्या थारोळ्यात पाहून एकच आक्रोश केला. घटनेमुळे चौरसिया कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, या चौफूलीवर गतीरोधक नसल्याने वाहनधारकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात देखील याच ठिकाणी एका दुचाकीस्वार तरुणाचा अपघातील मृत्यू झाला होता.त्यानंतरही या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात आले नाही. परिणामी, आज पुन्हा अपघात होवून एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.






