ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पादचारी पूल उभारण्यावरून आरोप करणारे ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांना घेराव घालत जाब विचारणाऱ्या शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनीच तक्रार केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका राधिका फाटक, मिनल संख्ये, साधना जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर हे सहा नगरसेवक, नगरसेविकांसह राजू फाटक आणि अन्य शिवसैनिकांचा समावेश असून मास्क न लावणे, सुरक्षित वावराचे पालन न करणे, विना परवाना एकत्रित येऊन मनाई आदेशाचे भंग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
ठाणे महापालिका सिंघानिया स्कूल, घोडबंदर रोडवरील कार्मेल स्कूल, पंचामृत सोसायटी येथे ३ पादचारी पूल उभारणार आहे. त्यातील दोन पूल मेट्रोच्या मार्गामुळे बाधीत होणार आहेत. या कामातून महापालिकेची १३ कोटी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करून ही कामे सत्ताधारी शिवसेनेकडून निवडणूक निधीसाठी केली जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला होता. या आरोपानंतर संतप्त शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी डुंबरे यांना १२ मार्च रोजी महापालिकेतील त्यांच्या कार्यालयात घेराव घालत घोषणाबाजी केली होती. तसेच माफी मागण्याची मागणी केली होती.
या घेरावामुळे करोना आपत्तीच्या काळातील मनाई आदेश आणि सुरक्षित वावराचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच या प्रकाराची माहिती मिळताच महापालिका मुख्यालयात पोहचलेल्या भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच अडविले असल्याचा आरोप करत या प्रकरणी भाजपने संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडेही करण्यात आली होती. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या सहा नगरसेवक, नगरसेविकांसह ३० ते ४० महिला, पुरुष कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महापौर नरेश म्हस्के यांना संपर्क केला असता, हा गुन्हा तितका गंभीर नसून या प्रकरणी तक्रारदार पोलीसच असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांना घेराव घालण्यासाठी आलेल्या गर्दीला मज्जाव न करणाऱ्या गेटवरील सुरक्षा रक्षकांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. या सुरक्षारक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेतून तात्काळ कमी करण्यात यावे. तसेच कर्तव्यातील कसुरीबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी सुरक्षा अधिकारी यांना दिले आहेत.






