पाटणादेवीत भास्कराचार्य मॅथसिटीला चालना देण्याची खा.उन्मेश पाटील यांची लोकसभेत मागणी

  • जळगावात नविन नवोदय विद्यालयाची स्थापना
  • अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्राकरीता अनुदानाची केली जोरदार मागणी

नवी दिल्ली – काल लोकसभेत नवीन शैक्षणिक अनुदान धोरणावरील चर्चेत सहभागी होताना खासदार उन्मेश पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करीत जळगाव जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता नव्याने नवोदय विद्यालयाची स्थापना करावी, पाटणादेवी परिसरात देशातील एकमेव भास्कराचार्य मॅथसिटी निर्मितीकरता केंद्राने भरीव मदत करावी त्याचप्रमाणे अंमळनेर येथील शंभर वर्षे परंपरा असलेल्या प्रताप तत्वज्ञान केंद्राला अनुदान देऊन या अभ्यासक्रमांस वैश्विक रूप प्राप्त करून देण्यासंदर्भात हालचाल करावी.या जोरदार मागण्या लोकसभा अधिवेशनात केल्याने जिल्ह्यातील शिक्षण प्रेमी, शिक्षण तज्ञांकडून खासदार उन्मेश पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

नवी दिल्लीत शिक्षण धोरण अनुदानावरील चर्चेत खासदार उन्मेश पाटील सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांच्यासह खासदार सदनात उपस्थित होते. खासदार उन्मेश पाटील यांनी सविस्तर विवेचन करीत सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे की माझा नवतरुण नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा तयार व्हावा यासाठी त्याला आत्मनिर्भर करणारे शिक्षण मिळावे. गेल्या अनेक वर्षे सत्ता भोगणारे विरोधकांनी त्याच पॉलिसी कायम ठेवत शिक्षण पद्धती संकुचित ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम नव्या पिढी जवळ पात्रता आहे. माञ स्किल नसल्याने ते बेरोजगार राहीले. आपल्या केंद्र सरकारने मात्र शिक्षणासोबत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स्किल डेव्हलपमेंट साठी विशेष प्रयत्न केले. स्व. अटलजी नेहमी म्हणत तुटे मनसे कोई खडा नहीं होता. अटलजी यांच्या सरकारच्या काळातच सर्व शिक्षा अभियान धोरण देशात दिले गेले. यांचा आम्हाला अभिमान आहे.

खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील चौफेर शिक्षण प्रगतीसाठी जोरदार मागण्या मांडल्या. खासदार उन्मेश म्हणाले वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नवीन नवोदय विद्यालयाची स्थापना माझ्या मतदारसंघात करावी तसेच चाळीसगाव जवळील गौताळा अभयारण्यात पाटणादेवी मंदीर परिसर येथे शून्याचा शोध लावणारे भास्कराचार्य यांच्या नावाने मॅथसिटी स्थापन करावी ही जोरदार मागणी केली . भास्कराचार्य यांच्या नावाने देशातील एकमेव मॅथसिटी सुरू झाल्यास भास्कराचार्यांच्या कार्याचा प्रसार आणि गौरव तसेच या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याची एक अनोखी संधी केंद्र सरकारला प्राप्त झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे जगातील एकमेव सायन्स सिटी हैदराबाद येथे स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न केंद्र सरकारने पाटणादेवी परिसरातील जागी भास्कराचार्य मॅथ सिटी तयार करण्यासाठी करावे अशी विनंती त्यांनी लोकसभेत केली.

गेल्या शंभर वर्षे परंपरा असलेल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र या दुर्लक्षित केंद्राला अनुदान देऊन हा अभ्यासक्रम जगासमोर कसा येईल यासाठी वेगळे प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी या लोकसभा अधिवेशनात करून सभागृहाचे लक्ष वेधले.या तिन्ही मागण्यांमुळे जळगाव लोकसभा मतदार संघाची शैक्षणिक उंची वाढणार असून शिक्षण क्षेत्रात खासदार उन्मेश पाटील यांच्या या मागण्यांकरिता अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here