रूग्णवाहिकेने पती-पत्नीला चिरडले

बुलढाणा (प्रतिनिधी) – रस्त्याच्याकडेला झोपलेल्या दोन परिवाराच्या अंगावरून भरधाव रूग्णवाहिका गेल्याने त्याखाली चिरडून पती-पत्नीचा मृत्यू झाला तर त्यांचा चार वर्षीय मुलगा व अन्य एक जोडपेही गंभीर जखमी झाले आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकात आज पहाटेपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली. लोखंडाचे कोयते, कुऱ्हाडी व दगडाचे पाटे वरवंटे तयार करून विकणारे हे दोन गरीब परिवार रात्रीचा विसावा म्हणून रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. त्याचवेळी तेथून भरधाव जात असलेल्या एक खासगी रूग्णवाहिकेचे टायर फुटल्याने ती गाढ झोपेत असलेल्या पाच जणांच्या अंगावरून गेली. त्यामुळे पती-पत्नी चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा चार वर्षीय मुलगा व अन्य एक जोडपेही गंभीर जखमी झाले.

यामुळे परिसरात क्षणार्धात हाहाकार उडाला. या घटनेत अनिल पडळकर (वय ३३) हे जागीच ठार झाले. तर पत्नी मायाबाई पडळकर (वय ३०) हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचा चार वर्षाचा मुलगा आकाश हा अत्यवस्थ आहे. तसेच दुसऱ्या परिवारातील शेषराव सोळंके(वय ४०) व पत्नी बेबीबाई शेषराव सोळंके(वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. शहर पोलिसांनी याप्रकरणी खासगी रूग्णवाहिकेच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here