पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ताडोब्यात गुप्त दौऱ्यावर

नागपूर (प्रतिनिधी) – करोनाच्या काळातील दौरे, बैठका आणि व्यस्ततेतून वेळ काढत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी ताडोबा गाठले. व्याघ्रसफारी करीत प्रकल्पातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. अतिशय गुप्त पद्धतीने हा दौरा करून बुधवारी मुंबईकडे रवाना झाले. नागपूर विमानतळावर ठाकरे हे दिसून आल्यानंतर या दौऱ्याविषयीची माहिती पसरली.

ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जगविख्यात आहे. देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच प्रकल्पाकडे वळतात. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी ताडोबात मुक्कामी आले. मोहर्ली येथील एका खासगी रिसोर्टवर थांबले होते, अशी माहिती आहे. खासगी दौरा असल्याने अतिशय गोपनीय ठेवण्यात आला होता. यादरम्यान त्यांनी केलेल्या सफारीत व्याघ्रदर्शन झाले. प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकल्पाविषयीचे सादरीकरण केले. ताडोब्यात वन आणि वन्यजीव संवर्धनाचे कार्य उत्तम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

aditya-thakare-at-airport

मुंबईचे पालकमंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या ताडोबा दौऱ्याबाबत निलेश राणे यांनी टीका केल्यावर सदर ताडोबा दौऱ्याची बाब समोर आली. ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत बोलले जात असताना ताडोब्यात सुट्टी घालविण्यात आदित्य ठाकरे व्यस्त आहेत. मग मुंबईला कोण वाचवेल’, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले होते. या ट्वीटमुळे ठाकरे यांचा दौरा उघड झाल्याने त्यांनी परत मुंबईची वाट धरल्याचीही चर्चा आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here