नवी दिल्ली – रेशन दुकानावर रेशन घेण्यासाठी लांब रांगा लागलेल्या असल्याचं चित्र अजूनही अनेक ठिकाणी दिसतं. आता मात्र ती प्रक्रियाही डिजिटल होत असून, केंद्र सरकारतर्फे मेरा रेशन हे मोबाइल अॅप सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे घरबसल्या मोबाइलवरून आपल्या रेशनधान्याची नोंदणी करणं शक्य होणार आहे.
‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना केंद्र सरकारतर्फे काही काळापूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचा भाग म्हणूनच हे अॅप सादर करण्यात आलं आहे. मेरा रेशन अॅपद्वारे लोकांना त्यांच्यापासून सर्वांत जवळ असलेल्या रास्त धान्य दुकानाची माहिती मिळेल. तसंच आपली पात्रता, अलीकडे केलेले व्यवहार वगैरे माहितीही त्यातून मिळू शकेल. सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच ते आणखी 14 भाषांमध्ये उपलब्ध केलं जाणार आहे.
ज्यांची सातत्याने बदली होते, त्यांना प्रत्येक ठिकाणी गेल्यावर नव्याने रेशन कार्ड काढणं गैरसोयीचं होतं. त्यामुळे ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे कधी कोणत्या दुकानातून रेशन धान्य घेतलं होतं, याची नोंद या ॲपमध्ये असेल.
‘वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेच्या अनुषंगाने सर्व लाभार्थी, खासकरून प्रवासी लाभार्थी, रेशन दुकान डीलर आणि सर्वच घटकांसाठी ही प्रक्रिया सोपी करणं हा अॅप सादर करण्यामागचा उद्देश आहे,’ असं अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितलं.






