जालना (मुनीर खान) – गाईच्या दुधाला सरसकट १० रुपये लिटर अनुदान व दुध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदानाची मागणी करण्यासाठी भाजपा, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइ या महायुतीतर्फे १ ऑगस्टला राज्यव्यापी दुधएल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबतचा इशारा देणारे पत्र जालना येथील भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठा, नकली सोयाबीण बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळाबाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटात शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या मालिकेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने, दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रात १ कोटी ४० लाख लिटर गाईचे दुध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर दूध सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दुध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वतः हॉटेल, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुध विक्रीमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्याने, दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध ३५ रुपये प्रतिलिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना आणि उत्पादकांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान व दुध भुकटी करिता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून रु.३० प्रतिलिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्यांकरिता भाजपातर्फे सर्व शेतकरी १ ऑगस्टला राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करणार आहे.
या निवेदनावर भाजपा किसान मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे यांच्यासह ह.भ.प. रमेश महाराज वाघ, सर्जेराव दादा जाधव, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष कैलासराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







