रिप्ड जीन्स वादात आता अभिनेत्री कंगनाची टिवटिव

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी रिप्ड जीन्स वरून जे वक्तव्य केले होते त्यावरून सुरू झालेल्या वादात आता कंगना रनौत हिने देखील उडी घेतली आहे. मुख्यमंत्री रावत यांनी जे वक्तव्य केले होते त्यावरून त्यांच्यावर सर्वचजण टीका करत असताना, कंगनाने मात्र या सगळ्यांपासून वेगळी भूमिका घेतली आहे. अर्थात ही भूमिका घेत असताना तिने मुख्यमंत्री रावत यांचे समर्थन जरी केले नसले तरी त्यांचेच मत तिने एका वेगळ्या अंदाजात मांडले आहे.

कंगनाने रिप्ड जीन्स घातलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, आणि त्यासोबत लिहिले आहे की, जर तुम्हांली रिप्ड जीन्स घालायची असेल तर, त्यात तुम्ही या फोटोंप्रमाणे कूल दिसले पाहिजे. त्यातून तुम्ही भिकारी नाही तर स्टायलिस्ट दिसायला पाहिजे. परंतु सध्या जे तरुण मुले-मुली रिप्ड जीन्स घालतात ते स्टायलिस्ट दिसत नाहीत. कंगनाच्या या ट्विटवरून या वादाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सगळ्यात आधी अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने केला होता. आमचे कपडे नाही तर तुमची मानसिकता बदला असे सुनावत तिने स्वत:चा रिप्ड जीन्समधला फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिची आजी जया बच्चन यांनीही या वक्तव्याचा विरोध केला होता. अभिनेत्री गुल पनाग हिने देखील आपल्या मुलीबरोबर रिप्ड जीन्स घातलेला फोटो पोस्ट करत या प्रकरणी आपला निषेध नोंदवला होता. याशिवाय अनेक बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी रिप्ड जीन्समधील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत आपला विरोध व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here