मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे भारतीय जनता पक्षाने रचलेला कुटील कारस्थान असून हे पत्र भाजपनेच परमबीर सिंग यांना लिहून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे.
नुकतेच विरोधी पक्षनेते दिल्लीला जाऊन आले, तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तेव्हाच हे कुटील कारस्थान रचले गेले, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी सिंग यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे, शिवसेनेला नेस्तनाबूत करायचे आणि स्वत: सत्तेवर यायचे असे हे कुटील कारस्थान असल्याचे चव्हाण म्हणाल्या.
राज्यातील सरकार मजबूत आहे. ते सरकार लोकांच्या मनातून उतरवण्यासाठी हा बालिश प्रकार भाजपने केला आहे असा प्रतिआरोप करतानाच हा कट थोड्याच दिवसात उघडकीला येईल, असेही त्या म्हणाल्या. पोलिस सेवेत असलेला मोठा अधिकारी गृहमंत्री अमित शहा यांचा आशीर्वाद असल्याशिवाय असे आरोप करू शकत नाही. सिंग यांनी केलेला आरोपच मुळात बालिश आहे. कारण इतका खुलेआम भ्रष्टाचार कोणीही करत नाही. ज्या देशाचे गृहमंत्री स्वत: तडीपार असतात, त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप असतात, त्यांच्या डोक्यातून अशी सुपिक कल्पना निश्चितच निघू शकते.
आज महाराष्ट्राने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पाहिलेली आहेत. मात्र कोणताही भ्रष्ट्राचार इतक्या खुलेआम होत नाही. अनिल देशमुख हे आज ५-७ वेळा निवडून आले आहेत. २५-३० वर्षे त्यांनीही राजकारणात घालवली आहेत आणि भ्रष्टाचार इतक्या खुलेआम करण्याचा मूर्खपणा कुठलाही मंत्री करणार नाही, असे चव्हाण पुढे म्हणाल्या.






