महाराष्ट्राच्या लालपरीला कर्नाटकातील रस्ते बंद

सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेऊन कर्नाटक राज्य शासनाने महिनाभरापासून उमरगा तालुक्यालगत असलेल्या गुलबर्गा मार्गावरील खजुरी व हैदराबाद मार्गावरील तलमोड सीमेवर नाकेबंदी सुरू केली होती. आता कर्नाटक प्रशासनाने गुरुवारी दुपारपासून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या लालपरीला प्रवेश बंद केल्याने तीन दिवसांपासून बसफेऱ्या बंद झाल्या आहेत.

औरंगाबाद-गुलबर्गा बस खजुरी-कर्नाटक सीमेवर पोलिस प्रशासनाने थांबवली. प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जाणार असल्याचा पवित्रा घेण्यात आल्यामुळे बस परत उमरगा आगारात आल्या. अचानक झालेल्या निर्णयामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

अनेक प्रवाशांना आडमार्गाचा अवलंब करत घर गाठण्याची वेळ आली. एक बस रोखल्यामुळे दुपारच्या चारनंतर उमरगा आगारातून जाणारी जालना-गुलबर्गा अाणि औरंगाबाद-गाणगापूर या दोन्ही बस आगार प्रशासनाने बसस्थानकात थांबवल्या. कर्नाटक प्रशासनाने खबरदारीचा घेतलेला निर्णय हा योग्य वाटत असला तरी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसना मात्र मुभा दिली जाते.

कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोरोना निगेटिव्ह चाचणीचे बंधन नाही, फक्त जाणाऱ्यांना बंधन आहे. हा विरोधाभास वाहनातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा ठरतोय. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसच्या फेऱ्या महाराष्ट्रात अधिक आहेत. त्यांच्यासाठीही परतीच्या प्रवासादरम्यान हा नियम लागू असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here