अनिल देशमुख प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहीजे – शरद पवार

नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिल्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नाहीए. तसंच १०० कोटींच्या वसुलीचे पैसे कुणाकडे गेले? याचा उल्लेख नाही, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

पत्रकार परिषद घेण्यापूर्वी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राची चौकशीचे आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. या प्रकरणी त्यांनी योग्य ती चौकशी करावी, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आल्यानंतर परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं. तसंच परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतर का पत्र लिहिलं? आयुक्त पदावर असताना परमबीर सिंग यांनी आरोप का केले नाही? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण विरोधकांना यश येणार नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांप्रकरणी सर्व नेत्यांशी आपण चर्चा करू. तसंच अनिल देशमुखय यांचं म्हणणं आधी ऐकून घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अनिल देशामुख्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत उद्या निर्णय होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत उद्या चर्चा करू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मनसुख यांची गाडी सचिन वाझेंनी घेतली होती. त्यात स्फोटकं ठेवली होती. सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा निर्णय हा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नव्हता. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना पदावर घेतलं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आजची बैठक होईल की नाही हे सांगता येत नाही. ही बैठक उद्याही होऊ शकते, असं शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here