मुंबई (प्रतिनिधी)-चीनकडे जगातले सर्वात मजबूत लष्कर असून भारताचा या यादीत चौथा क्रमांक लागतोय असं डिफेन्स वेबसाइट असलेल्या मिलिटरी डायरेक्टच्या नव्या अहवालात सांगण्यात आलं आहे. भारताने १०० पैकी ६१ गुण मिळवले आहेत.
चीनने या १०० पैकी ८२ गुण मिळवत या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. अमेरिका आपल्या लष्करावर जगात सर्वाधिक खर्च करते. असं असलं तरी अमेरिका या यादीत ७४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशिया ६९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर, भारत ६१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर तर फ्रान्स ५८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटनने या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये कसेबसे स्थान टिकवले असून ४८ गुणांसह तो नवव्या क्रमांकावर आहे.
हा अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लष्करावर करण्यात येणारा खर्च, लष्करी सैन्याची संख्या, लष्कर, वायूदल आणि नेव्ही मध्ये असणारे एकूण क्षेपनास्त्रे, सरासरी पगार, लष्करी वेपन्स आणि त्याचे वजन अशा अनेक कसोट्यांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या कसोट्यांच्या आधारे चीनकडे जगातील सर्वात मजबूत लष्कर असल्याचं स्पष्ट झालंय.






