आज होणार फैसला : गृहमंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव; शरद पवारांनी दाखवले बोट मुख्यमंत्र्यांकडे

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा देण्यासाठी चहूबाजूने दबाव वाढत आहे. विरोधी पक्ष भाजपने रविवारपासून राज्यभरात आंदोलनाचा धडाका लावला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जोरदार खलबते सुरू आहेत. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्रीच घेतील असे सांगितले.

रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नेते तातडीने दिल्लीत पोहोचले. त्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते कमलनाथ आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच तास चर्चा केली. बैठकीचा तपशील कळू शकला नाही. मात्र बैठकीत अनिल देशमुख प्रकरणावर चर्चा झाली नाही असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास पोलिस आयुक्तांचे आरोप सरकारला मान्य असल्याचा समज होईल. सरकारची प्रतिमा मलिन होईल. विरोधक हे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीसुद्धा मागणी करतील. त्यामुळे देशमुख यांच्यासंदर्भात नवा पर्याय पुढे येत आहे. देशमुख यांची गच्छंती न करता खातेबदल करण्यात यावा, असा सूर आघाडी सरकारमध्ये आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर यांनी आरोप केले आहेत. पवारांच्या निवासस्थानी पंढरपूर पोटनिवडणुकीवर चर्चा झाली,असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्री दिल्ली विमानतळावर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here