मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई, पुणे आणि नागपुरात करोनाचे रुग्ण वाढत असून ही वाढती रुग्णसंख्या धोक्याची आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करावे लागेल, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यात गेले काही दिवस रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठल्यानं चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपुर या तीन शहरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जर नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लवावा लागेल, असं म्हटलं आहे.
‘मुख्यमंत्र्यांशी मी काल फोनवर चर्चा केली तेव्हा त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्ती केली होती. राज्यात रोज २५ ३० या संख्येनं रुग्ण आढळत असतील तर हे योग्य नाही आपल्याला फार कडक उपाययोजना कराव्या लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच, रुग्णसंख्या जास्त वाढत असतील तर काही शहरांत लॉकडाऊन करावं लागेल किंवा रुग्णवाढीचा दर असाच अधिक कालावधी राहिला तर राज्यातही अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे,’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.
‘उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याच्यांशी चर्चा झाल्यानंतर राज्यातील करोना परिस्थितीबाबत निर्णय घेण्यात येईल,’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं केलं आहे. ‘लॉकडाऊन टाळायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना पाळा. मास्क लावा, अंतर पाळा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.







