शिंदखेडा (प्रतिनिधी) – निमगुळ येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवून पाहणी केली. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपलब्ध बेड, ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा, लसीकरणाची माहिती डॉ.हितेंद्र देशमुख यांच्याकडून घेतली.
कोविड-19 चा प्रसार शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कोरोनाचा प्रभाव आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण निमगुळ गाव कॉरंटाईन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून पाहणी केली. त्याचप्रमाणे रुग्णालयात उपलब्ध बेड, ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा, लसीकरणाची माहिती तसेच कोरोना लसीकरणासाठी लोकांचा मिळणारा प्रतिसाद याबद्दलची माहिती डॉ.हितेंद्र देशमुख यांच्याकडून घेतली.
यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावात घराघरात जावून कोरोनाबाबत जनजागृती करा. गावात पदाधिकाऱ्यांची एक समिती तयार करुन गावकऱ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. मात्र जनसेवा करतांना स्वत:सह जनतेची काळजी घ्यावी, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. करोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील 58 देशात भारताच्या कोरोनालसीला मागणी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांना बळी पडू नका. कोरोनावरील लस अगोदर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नसून ग्रामस्थांनी डॉक्टरांना सहकार्य करावे तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे श्री.साळुंके यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्यासह शिवसेनेचे दोंडाईचा विभागप्रमुख कल्याण बागल, उपविभागप्रमुख शैलेश सोनार, युवासेनेचे आकाश कोळी, अनिल कोळी, आकाश बागल, एस.आर.बागल, गोपीचंद बागल, बाळा पाटील तसेच निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.






