मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – अँटिलिया प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथकाने दमणमधून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे.
यापूर्वी सोमवारीही एटीएस पथकाने अहमदाबादमधून एक व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्यानेच वाझे, शिंदे आणि नरेश गौर यांना 11 सिमकार्ड पुरवले होते, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले. यामधील एक सिमवरून 4 मार्चला रात्री 8.30 वाजता मनसुख यांना व्हाट्सअप कॉल करण्यात आला होता.
एटीएस पथकाच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येमध्ये वापरण्यात आलेले सिमकार्ड अहमदाबादच्या एका फॅक्ट्रीत काम करणाऱ्या काही लोकांच्या नावावर आहेत. या फॅक्ट्रीने 30-40 कर्मचाऱ्यांना सिमकार्ड सुविधा दिलेली आहे. तपासात आढळून आले आहे की, या सिमकार्डचा वापर मनसुख हत्या आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करण्यासाठी केला गेला आहे.
मुंबई एटीएस आणि गुजरात पोलिसांचे पथक अहमदाबाद, पालनपूर आणि कच्छच्या बोदकदेवमध्ये छापेमारी करून फॅक्टरीतपर्यंत पोहोचले. अटक करण्यात आलेली व्यक्ती फॅक्ट्रीचा मालक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु एटीएसने अजून याची पुष्टी केलेली नाही.






