काँग्रेस घेणार ठोस भूमिका; बाळासाहेब थोरातांनी बोलावली महत्त्वाची बैठक
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – धनंजय मुंडे, संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळं राज्यातील माहाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर होणाऱ्या आरोपांमुळं सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे. तर, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचीही देशपातळीवर प्रतिमा खराब होत असल्यानं काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
इतर राज्यांत आता निवडणुकांची रणधुमाणी सुरु आहे. त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसनंही या निवडणुकीच्या अनुषंगानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील घडामोडींचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यासंदर्भात आजच्या बैठकीत ठोस पावलं उचलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मनसुख हिरन हत्या, सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप यामुळं ठाकरे सरकारवर चहूबाजूंनी अडचणीत सापडले आहेत. याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवरही होत असल्याची चर्चा आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जरी या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. मात्र, दुसऱ्या राज्यातील निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींना शंका आहे. तसंच, महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीचे पडसाद पश्चिम बंगालमधील निवडणुकांवर पडणार असल्याची शक्यता आहे.






