अंत्यसंस्कारासाठी वेटींग लिस्ट; ओटे कमी पडल्याने जमिनीवर केले अंत्यसंस्कार
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – कोरोना बाधितांसाठी आरक्षित केलेल्या नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी ‘वेटिंग’ची वेळ आली आहे. दोन दिवसांत ४१ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ओटे व पिंजरे कमी पडत असल्याने अक्षरश: जमिनीवर चिता रचण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. दररोज ९०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळत आहेत. संसर्गाचा वाढता आलेख धडकी भरवणारा ठरत असताना मृत्यूचा आकडाही वाढत आहे.
दररोज आठपेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू होत आहेत. जळगाव शहरात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने मृतांवर जळगाव शहरातच अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी महापालिकेने कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कारासाठी नेरीनाका स्मशानभूमी आरक्षित केली आहे; परंतु गेल्या चार दिवसांत नेरीनाका येथील परिस्थिती गंभीर झाली असून, जागा कमी पडत असल्याने मृतांच्या नातेवाइकांना वेटिंग करावी लागत आहे.
नेरीनाका स्मशानभूमीत पालिकेकडून एकच कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी पालिकेच्या आस्थापनेवरील एकच कर्मचारी असल्याने नियोजन विस्कळीत होत आहे. ठेकेदाराकडील तीन कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात असली तरी प्रशासनाने नागरिकांचे हाल टाळण्यासाठी आणखी कर्मचारी नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे.
नेरीनाका स्मशानभूमीत १७ ओटे आहेत. त्यापैकी १२ पिंजरे तर ५ ओटे आहेत. सर्व १७ ओट्यांवर अंत्यसंस्कार झाल्याने जागा कमी पडत आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी थेट नातेवाइकांच्या मागणीनुसार जमिनीवरच चिता रचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील खुली जागादेखील कमी पडायला लागली आहे.
गेल्या दोन दिवसांत नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वाढले आहेत. रविवारी तर दिवसभरात २५ जणांवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जागा कमी असल्याने मृतांच्या नातेवाइकांना वेळ देण्यात येत असून अंत्यसंस्कारासाठी आता वेटिंग करावी लागत आहे.






