मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “शरद पवार यांनी ‘युपीए’चं अध्यक्षपद भूषवायला हवं”, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे ‘युपीए’च्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का? असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करू नये इतकाच आमचा सल्ला आहे,” असं म्हणत संजय राऊत यांना सुनावले आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला होता. ” ‘युपीए’ आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ ‘युपीए’चे अध्यक्षपद भूषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी ‘युपीए’चे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांचे म्हणणे आहे. अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी, नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष ‘युपीए’ किंवा ‘एनडीए’मध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून ‘युपीए’ची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्व मान्य होऊ शकते,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
भाजप खोटे आरोप लावून महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. ते म्हणाले, “राज्याची गोपनीयता भंग करण्याचे काम भाजपने केले आहे. खरी माहिती लवकरच राज्य सरकार जनतेला देईल. ज्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचे काम केले आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,” अशी मागणी करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, ”मनसुख हिरन हत्याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना ‘कॉल डिटेल्स रेकॉर्ड’चा (CDR) उल्लेख केला होता. हा ‘सीडीआर’ खोटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरा ‘सीडीआर’ असेल तर त्यांनी तो प्रसारमाध्यमे आणि जनतेला दाखवावा. देवेंद्र फडणवीस हे खोटा ‘सीडीआर’ दाखवून राज्याला बदनाम करण्याचे काम करत आहेत,” असा आरोप नाना पटोले यांनी केला.






